Adhik Maas Katha – Chapter 1

शुक आगमन

श्री गणेशाय नमः | श्री गुरुभ्यो नमः | श्री राधा कृष्णाभ्यां नमः ||

     शरणांगताचे कल्पवृक्षाप्रमाणे जो सर्व मनोरथ पूर्ण करतो, वृंदावनातील जनांचे जो निरंतर समाधान करतो, त्यांना पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आल्हाद देतो, अशा त्या अद्भुत पुरुषोत्तमाला मी वंदन करतो || नारायणाला प्रथम नमस्कार करावा, सर्व नरांमध्ये श्रेष्ठ अशा अर्जुनाला अर्थात 'नर' नामक ऋषीला नमस्कार करावा || सरस्वतीला नमस्कार करावा, भगवान वेद व्यासांना नमस्कार करावा, आणि त्यांचा जयजयकार करावा हेच उचित होय ||
     नैमिषारण्यात यज्ञाची सत्रा मागून सत्रे प्राचीन काळी चालत असत || त्यात भाग घेण्यासाठी अनेक ऋषी तेथे येत असत व काही काळ थांबून भारतभर यात्रेसाठी पुन्हा जात असत || कधी मोठमोठ्या ज्ञानाधिकाराचे अनेक ऋषी एका वेळी जमत असत कधी थोडे असत, पण यज्ञ सत्रे मात्र अखंड चालत असत || यज्ञ सकाळी होत असे व अपराण्ह काळी धर्मचर्चा, स्वाध्याय, प्रश्नोत्तरे, भगवंताच्या लीलांचे वर्णन, पुराण इतिहासांचे कथन आणि धर्मनिर्णयही होत असत || एकदा अनेक ऋषी एकाच वेळी जमले होते || त्यात असित, देवल, पैल, सुमंतु, पिप्पलायन, सुमती, काश्यप, जाबाली, भृगु व अंगिरा मुनी होते || वामदेव होते, सुतिक्ष्ण व शरभंग ऋषीही होते || पर्वत नावाचे मुनी होते || आपस्तंभ, मांडव्य, अगस्त्य, कात्यायन, रथितर, ऋभु, कपिल, रैभ्य हे मुनीही होते || गौतम, मुद्गल, कौशिक, गालव, क्रतु, अत्री, बभ्रू, त्रित, शक्ति, बुध, बौधायन, वसु असे ज्ञानी तपस्वी मुनीही होते || कौंडिन्य, पृथू, हारित, धूम्र, शंकु, संकृति, शनि, विभांडक, पंक, गर्ग, कानाद, जमदाग्नी, भरद्वाज, धूमप, मौनभावी, कर्कश, शतानंद, विशाल, विष्णुवृद्ध, जर्जर, जय, जंगम, पार, पाशधर, पूर, महाकाय, जैमिनी असे ऋषी होते || त्यात महाग्रीव, महाबाहू, सहोदर, महाबल, उद्यालक, महासेन, आर्त, आमलक प्रिय, ऊर्ध्वबाहु, ऊर्ध्वपाद, एकपाद, दुर्धर, उग्रशील, जलाशी, पिंगल, शांडीर, करूण, काल, कैवल्य, कलाधर, श्वेतबाहु, रोमपाद, कालाग्नि रुद्रग, श्वेताश्वतर असे ऋषी होते || त्यात शौनक मुनींना सर्वजण फार मान देत असत || शरभंग व पृथुश्रवा यांनाही लोक आदराने वागवित असत || या ऋषींच्या बरोबर त्यांचे अनेक शिष्य होते || ह्या ऋषींच्या अंगी लोकांवर अनुग्रह करण्याचे सामर्थ्य होते || ते ब्रह्मनिष्ठ होते, वेद व वेदांगे यांचे ज्ञाते होते || त्यांचा स्वभावच परोपकार करण्याचा होता || दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यात ते नेहमी तत्पर असत आणि श्रौत व स्मार्त कर्मात सर्वजण पारंगत होते || ते नैमिषारण्यात आले असता त्यांनी एक यज्ञ सुरू केला ||
     पुराणकथा सांगणारा सूत हा फारच बहुश्रुत, बुद्धिमान आणि उत्तम स्मरणशक्ती असलेला असा तेजस्वी व तपस्वी पुराणिक त्या काळात फार प्रख्यात होता || तो अनेक तीर्थक्षेत्रे पाहत पाहत नैमिषारण्यात पोहोचला || त्याने प्रवासात कोणती तीर्थे पाहिली त्यांची माहिती ऋषींना पुढे सांगितलीच, पण ऋषींनी आधी त्याचे स्वागत कसे केले ते पहा ||
     सूत आला, त्याने सर्वच ऋषींचा मोठा समुदाय पाहिला || अशा पुण्यपुरुषांचे एकाच वेळी दर्शन होण्याने त्याला फारच आनंद झाला || संसार सागरातून पैलतीराला साधकांना नेऊ शकणारे ते महान ऋषी, योगी, भगवदभक्त, संत, मुनी यांना नमस्कार करण्यासाठी तो लगबगिने पुढे झाला || ऋषींनीही सूताला पाहिले व त्यांना आनंद झाला || सूताने तांबूस वर्णाची वल्कले परिधान केली होती || त्याची मुद्रा शांत व आनंदित होती || मुद्रेवर भक्तिभाव, ज्ञानाचे शांत तेज, नेत्रांत योगशक्ती व प्रेम असे एकत्र होते || त्याला परमार्थाचे उत्तम ज्ञान होते || वेदांताचा तो ज्ञाता होता || अनेक सद्गुण त्याच्या अंगी होते || त्याने गोपीचंदाचे बारा तिलक लावले होते व गंधाने शंख, चक्र व हरिनाम यांच्या मुद्रा त्याने भाळावर व अन्य स्थानी उमटविल्या होत्या || त्याने गळ्यात तुलसीमाला घातली होती || माथी जटाभार बांधला होता || 'श्रीकृष्ण: शरणं मम' असा मंत्र तो सतत जपत होता || सर्व शास्त्रांचे सार त्याला ज्ञात होते || लोकांचे हित करण्यात तो मग्न असे || त्याने क्रोध जिंकला होता || तो जीवनमुक्त होता || तो जगाचा गुरू होता || व्यासांची त्याच्यावर पूर्ण कृपा होती || व्यासांप्रमाणेच तो निस्पृह होता || त्याला येताना पाहून ते नैमिषारण्यातील ऋषी आदराने एकदम उठले || नाना प्रकारच्या भगवंताच्या कथा ऐकण्याची त्यांना इच्छा होती || ते सगळे त्याच्याभोवती जमा झाले || तो सूत नम्रतेने हात जोडून त्यांना वंदन करू लागला ||
ऋषी त्याला म्हणाले -
"हे सुता ! तुला दीर्घ आयुष्य लाभो ||
तू महान भगवद भक्त आहेस ||
हे पहा, तुझ्यासाठी आम्ही उत्तम आसन तयार केले आहे ||
तू दमला असशी| या आसनावर बस ||"
त्याप्रमाणे त्याला आसन देऊन ते ऋषीही आपापल्या आसनांवर बसले || त्यावेळी सुताने प्रथम त्यांच्या तपश्चर्येविषयी चौकशी केली || कुशल प्रश्न विचारले || पुण्यकारक अशा कथा त्या ऋषींना ऐकायच्या होत्या || ते त्याला म्हणाले -
"हे भाग्यवंता सुता ! साक्षात व्यासांच्या वचनांचा खरा अर्थ तू जाणतोस म्हणून तू धन्य आहेस ||
फार काळाने तू नैमिषारण्यात आला आहेस ||
तू खुशाल आहेस ना?
तू व्यासांचा उत्तम शिष्य !
तू आम्हाला पूजनीय व प्रशंसा करण्यास योग्य वाटतोस ||
या असार संसारात हरिकथा श्रवण हेच एक सार आहे ||
तशा एकापेक्षा अधिक गोष्टी ग्राह्य असतात |
पण सर्वांमध्ये सारभूत आणि लोकांचा उद्धार करणारे असे जर काही तथ्य तुला माहित असेल
आणि सांगावेसे वाटत असेल तर ते सांग ||
अज्ञानाच्या अंधाराने लोक अंध झालेले असता त्यांना ज्ञानरुपी अंजन तूच देतोस ||
तू आम्हाला असे दिव्य रसायन ऐकव की जे भवरोगाला दूर करील ||
हरिच्या लीलांचे त्यात वर्णन असावे आणि अर्थातच ते आनंदप्रद व्हावे ||"
शौनकादि मुनींनी अशी विनंती केली || तेव्हा सूत नमस्कार करून त्यांना म्हणाला -
"हे ऋषीजन हो ! माझे भाषण आपण श्रवण करा ||
मी कोणत्या कोणत्या तीर्थयात्रा केल्या |
त्यांचे वर्णन ऐकून तुम्हाला आनंदच वाटेल ||
मी माझ्या निवासस्थानातून निघालो तो प्रथम पुष्कर तीर्थावर गेलो ||
तेथे स्नान केले ||
देव, ऋषी व पितर यांना उद्देशून मी तेथे तर्पण केले ||
नंतर मथुरेस यमुना नदीवर गेलो ||
तेथून प्रयाग पाहिले | काशी व गया क्षेत्रांस गेलो ||
तेथे पितृयज्ञ करून कृष्णावेणी तीर्थ पाहून |
गंडकी नदीच्या तीरी पुलह मुनींच्या आश्रमास गेलो ||
धेनुमती नदीत स्नान केले ||
सरस्वतीच्या तीरावर तीन दिवस राहिलो ||
नंतर दक्षिण दिशेस प्रवास केला ||
गोदावरी नदीची यात्रा केली ||
त्यानंतर कृतमाला, कावेरी, निर्विंध्या, ताम्रपर्णी, तापी, आकाशगंगा |
नंदा व नर्मदा इतक्या नद्यांच्या यात्रा केल्या ||
पुढे चर्मण्वती नदीची यात्रा केली ||
दक्षिणेस रामेश्वर तीर्थासही गेलो व उत्तरेस वदरीकाश्रमास गेलो ||
तेथे नारायणाचे दर्शन घेतले |
त्याचे स्तवन केले व तपस्व्यांना वंदन करून सिद्ध क्षेत्रास गेलो ||
परीक्षित राजा राज्यत्याग करून गंगातीरास गेला आहे असे मला हस्तिनापुरास कळले ||
तेथे गंगातीरी अनेक तपस्वी सिद्ध मुनी जमले होते ||
त्यांचे दिव्य दर्शन घेण्याकरीता मी तेथे गेलो ||
तेथे व्यासपुत्र शुकदेव यांचे दर्शन झाले ||
सोळा वर्षांचे ते शुक मोठे तेजस्वी, ब्रह्मज्ञानी, श्रीकृष्णाच्या चरणांचे नित्य ध्यान करणारे होते ||
त्यांचा देह अतिशय देदीप्यमान होता ||
त्यांचे सौंदर्य काय वर्णावे !
ते त्यावेळी अवधूत अशा अवस्थेत गंगातीरी ऋषींना भेटण्यास येत होते ||
त्यांचे अंग धुलिधुसर होते ||
त्यांची खरी थोरवी माहित नसल्यामुळे अडाणी मुले व स्त्रिया त्यांची थट्टा करीत त्यांचा पाठलाग करीत होत्या ||
त्यांच्याकडे पाहून पोरेटोरे थुंकत होती व त्यांचा उपहास करीत होती ||
पण हत्तीला मक्षिकांचे जसे काहीच भय वाटत नाही |
तसे ते निर्लिप्त मनाने धीरगंभीर गतीने चालत येत होते ||
त्यांना पाहताच परीक्षितसह सर्व ऋषी उठले व आनंदाने हात जोडून उभे राहिले ||
त्यावेळी हा सोळा वर्षांचा मुनी सामान्य नसून खरोखरच मोठ्या योग्यतेचा असला पाहिजे |
असे ओळखून त्या मुलांना व स्त्रियांना लाज वाटली व त्यांनी पश्चात्तापाने शुकदेवांना नमस्कार करून दूर गमन केले ||
ऋषींनी शुकांसाठी उत्तम आसनाची व्यवस्था केली व सर्वजण त्यांच्या भोवती जमले ||
सर्वांनी त्यांची पूजा केली ||
ते सर्वजण कमळाच्या पाकळ्या जशा कमलगर्भाभोवती शोभतात तसे शोभत होते |
व शुकमुनीही तारांगनांनी वेष्टित असा चंद्राप्रमाणे शोभून दिसत होते ||"

|| अध्याय पहिला समाप्त ||

Leave a comment