Pimpalpuja Vrat Katha

श्री गणेशाय नमः | श्री गुरुभ्यो नमः ||
     श्रावण महिना सुरू झाला की गावागावात भक्तीचा सुगंध दरवळू लागतो. कुठे मंगळागौरीची पूजा, कुठे शिवाची आराधना आणि कुठे पवित्र पिंपळाची पूजा. अशीच ही एका गरीब ब्राह्मणाची कथा. त्या ब्राह्मणाला दोन मुली होत्या. श्रावणात तो रोज गावात पूजा सांगायला जात असे. पूजा आटोपून घरी परतताना त्याला खारीक, खोबरे मिळत असे.
एके दिवशी मुलींनी विचारले,
“बाबा, तुम्ही रोज खारीक-खोबरे कुठून आणता ?”
ब्राह्मण म्हणाला,
“गावातील वाणी समाजाच्या सुवासिनी श्रावणात पिंपळाचे व्रत करतात.
पूजा झाल्यावर त्या हे प्रसाद म्हणून देतात.”
मुलींना आश्चर्य वाटले,
“मग आपणही पिंपळाची पूजा का करू नये ?”
ब्राह्मण हसला,
“बाळांनो, व्रतासाठी लागणारे साहित्य आपल्याला परवडणार नाही.”
पण मुलींचा हट्ट पाहून त्याने एक साधा मार्ग सांगितला -
“श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस हे व्रत करायचे.
पण आपल्याकडे पैसा नाही, म्हणून आघाड्याची पाने घेऊन त्यांची बेलफुले करा,
बारीक वाळूचे हळद-कुंकू करा आणि जाड वाळूचे खारीक-खोबरे मानून पूजा करा.”
मुलींनी श्रद्धेने व्रत सुरू केले. त्यांच्याकडे वैभव नव्हते. पण मनापासून केलेली भक्ती होती. आणि भक्तीमध्येच देवाला सर्वात प्रिय असलेली गोष्ट असते.
     कालांतराने, एके दिवशी राजा आणि प्रधानाची मुले शिकारीहून परतत असताना त्यांनी त्या दोन्ही मुलींना पिंपळाची पूजा करताना पाहिले. त्यांना त्यांच्या साधेपणात आणि भक्तीत विलक्षण सौंदर्य दिसले. दोघांनीही मनोमन ठरवले - “विवाह करायचा असेल, तर याच मुलींशी.” राजाला सुरुवातीला हे मान्य नव्हते. पण मुलांचा निर्धार पाहून शेवटी गरीब ब्राह्मणाच्या एका मुलीचा विवाह राजपुत्राशी आणि दुसरीचा प्रधानपुत्राशी झाला. दोन्ही मुली आपापल्या घरी गेल्या. मात्र काळाने एक वेगळेच रूप दाखवले. राजाची राणी राजवैभवात रमली आणि वडिलांनी सांगितलेल्या पिंपळाच्या व्रताचा तिला विसर पडला. पण प्रधानाची राणी मात्र विसरली नाही.
     श्रावण आला की ती नऊ दिवस श्रद्धेने पिंपळाची पूजा करी. उपवास करी. पोथी ऐके. आणि मनोभावे प्रार्थना करी. काही काळात दोन्ही बहिणींच्या आयुष्यातील फरक दिसू लागला. राजाच्या राणीला झालेली मुले काही महिन्यांतच दगावत. पण प्रधानाच्या राणीची मुले मात्र निरोगी वाढत गेली. हे पाहून राजाच्या राणीच्या मनात मत्सर निर्माण झाला. एकदा तिने विष मिसळलेला रस बहिणीच्या मुलांसाठी पाठवला. पण प्रधानाच्या राणीने तो रस तुळशीवृंदावनाजवळ ठेवून दिला. तेव्हा लोकश्रद्धेनुसार, पिंपळामध्ये विष्णूचे आणि त्याच्याशी संबंधित देवतांचे पवित्र अस्तित्व मानले जाते, तर शिव-पार्वती हे भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. कथेप्रमाणे, शिवाने त्या विषाचा अमृताने नाश केला. मुलांनी रस प्यायला आणि काहीही झाले नाही. राजाच्या राणीने पुन्हा विषारी लाडू पाठवले. त्यांचेही तसेच झाले. शेवटी तिने बहिणीच्या मुलांना आपल्या घरी जेवायला बोलावले. अन्नात विष मिसळले. पण भक्तीच्या सामर्थ्याने आणि देवकृपेने ते अन्नही निष्प्रभ झाले. राणीचा संताप मात्र वाढतच गेला. तिने मुलांचा जीव घेण्याचा आदेश दिला. पहिल्यांदा शिपायांना दया आली आणि त्यांनी मुलांना सोडून दिले. दुसऱ्यांदा मात्र मुलांना जंगलात नेण्यात आले. त्यांची मुंडके कापून राणीजवळ देण्यात आली. ती मुंडके राणीने लपवून ठेवली.
     भक्ती संकटात आली की देव स्वतः धावून येतो. कथेनुसार, इकडे शंकर पार्वतीला चिंता पडली. भक्तिभावाने समर्पित अश्या आपल्या भक्ताच्या व्रताचा भंग होऊ नये म्हणून,  शंकराने गोसावीचे रूप घेतले आणि पार्वतीने मांजरीचे रूप धारण केले. गोसावी राजवाड्यात आला, अल्लख निरंजन म्हटले. राणीच्या हातूनच भिक्षा घेण्याचा हट्ट धरला. राणी रागारागाने उठली व सुपात दाणे घेऊन आली आणि राणी इकडे उठून येत नाही तोवर मांजरीने मुलांची शिरे घेऊन जंगल गाठले. जिथे मुलांचे देह पडले होते, तिथे तिने ती शिरे आणून जोडली आणि देवकृपेने मुलांनी पुन्हा डोळे उघडले. ते हसत-खेळत घरी परतले.
आईने विचारले,
“बाळांनो, आज एवढा उशीर का झाला ?”
मुलं म्हणाली,
“आई, आम्हाला जणू काळझोप लागली होती.”
आईने डोळे मिटून प्रार्थना केली -
“काळझोप तुम्हाला कधी न लागो, ती तुमच्या वैऱ्यांना लागो.”
     इकडे राणीला वाटले मुले मेलि म्हणून, त्यांची आई रडत असेल. ते पाहण्यासाठी दासीला पाठवले. तर काय आश्चर्य, दासीने पहिले कि, प्रधान पोथी वाचत आहे. त्याची पत्नी पूजेचे साहित्य काढीत आहे आणि मुले अवती भवती खेळत आहेत. दासी घरी आली. राणीला सांगू लागली, बाई बाई मुले आनंदाने खेळत आहेत. पण राजाची राणी अजूनही शांत झाली नव्हती. राणी डोके बांधून झोपली. राजाने हकीगत विचारली असता, तिने आता, गावातील पवित्र पिंपळच तोडण्याचा हट्ट धरला. त्यावर समजावून सांगून सुद्धा, न ऐकल्याने आणि नाईलाजाने, राजाने माणसांना पिंपळ तोडण्याचा आदेश दिला. पहिला घाव पडला आणि तोच घाव त्या माणसांच्या अंगावर झाला.
ते रक्तबंबाळ होऊन राजाकडे परत आले,
“महाराज, हा साधा वृक्ष नाही. आम्ही त्याला तोडू शकत नाही.”
राजाला तेव्हा जाणवले, ज्याला आपण केवळ झाड समजत होतो, त्यामागे श्रद्धेची आणि देवत्वाची शक्ती उभी आहे.
     दुसऱ्या दिवशी प्रधानाच्या राणीस निरोप गेला. तुमची मोठी बहीण म्हणजे राजाची राणी खूप आजारी आहे. चालत असाल तर चालत्या मार्गाला लागा, पाणी पित असाल तर गुळणी टाकायला इथे या. इकडे प्रधानाच्या राणीचा पूजेचा शेवटचा दिवस होता. तशीच ओल्या केसांनी बहिणीकडे गेली. आणि म्हणाली, आपल्या गरीब बापाने सांगितलेले व्रत तू राजाच्या राजेशाहीत आल्यानंतर विसरून गेली. पण मी ते व्रत कडक पाळले. श्रावण मास आला कि नऊ दिवस उपवास करावा. पहिल्या दिवशी नऊच्या संख्येत पूजा काढावी आणि पूजेला जावे. यावर राजाची राणी म्हणाली, मी पण तुझ्याबरोबर पूजेला येईल. इकडे प्रधानाची राणीने  आपल्या व्रताच्या शेवटच्या दिवशी सर्व वस्तू नऊ नऊ काढल्या व पिंपळाच्या पूजेसाठी निघाली. राजाच्या राणीने पण पहिल्या दिवशी तशीच पूजा काढली, नऊ नऊ दुरड्या भरल्या. राजाची राणीही तिच्यासोबत आली. प्रधानाच्या राणीचे हळदी कुंकवाचे पाऊल पडायचे तर राजाच्या राणीचे अग्नीचे पाऊल पडायचे.
महाविष्णूजवळ प्रधानाची राणी म्हणाली,
"तुझा पहिला दिवस, तू पहिले अक्षदा वहा."
राजाच्या राणीने पिंपळाला अक्षता वाहिल्या आणि पिंपळ जळून गेल्यासारखा दिसला. राजाची राणी संतापून पूजा सोडून निघून गेली. प्रधानाची राणी मात्र तिथेच उभी राहिली. तिने डोळे मिटले आणि मनापासून प्रार्थना केली,
“हे महाविष्णू… हे पिंपळेश्वरा… माझी भक्ती खरी असेल, तर आज मला दर्शन द्या.
तुमच्या दर्शनाशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही.”
क्षणभर सर्वत्र शांतता पसरली. आणि मग जणू निसर्गानेच तिच्या प्रार्थनेला उत्तर दिले. नदीचे पाणी भरून आले. ब्राह्मण पूजा सांगण्यासाठी येऊन बसला. आणि ज्या पिंपळाला पालवी नव्हती, त्याला पुन्हा कोवळी पालवी फुटली. प्रधानाची राणी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्या पिंपळाकडे पाहत राहिली. तिला जाणवले, देवाला मोठमोठ्या वस्तूंची गरज नसते, त्याला हवी असते ती निर्मळ श्रद्धा. राजाची राणीही शेवटी आपल्या चुकीची जाणीव करून घेते आणि बहिणीबरोबर पिंपळाचे व्रत करू लागते.
     म्हणूनच श्रावणात पिंपळाची पूजा करताना केवळ एका वृक्षाची पूजा केली जात नाही; तर त्यामागे असलेल्या जीवन, प्राण, निसर्ग आणि परमेश्वराच्या चैतन्याला नमस्कार केला जातो. पिंपळाला आपल्या परंपरेत महाविष्णूचे स्वरूप मानले जाते आणि त्याच्या मुळाशी, खोडाशी, फांद्यांमध्ये देवत्वाचे वास्तव्य असल्याची श्रद्धा आहे. म्हणूनच पिंपळाची पूजा म्हणजे निसर्गाला नमस्कार, देवाला नमस्कार आणि आपल्या श्रद्धेला नमस्कार.
 “पिंपळ पिंपळ पिंपळेश्वरा, तुझ्या पदी रुद्रकळा।
ब्राह्मण येतील दर्पणा, गाई येतील गोठ्याला,
आम्ही येऊ तुझ्या दर्शनाला॥”
जसा पिंपळेश्वर त्या भक्त स्त्रीवर प्रसन्न झाला, तसा तो तुम्हा-आमच्यावरही प्रसन्न होवो. ही साठा उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी सफल संपूर्ण.

Leave a comment